भारताची एकूण लोकसंख्या ही १.२५ अब्ज आहे ज्यापैकी १० टक्के लोक हे भटक्या आणि विमुक्त समाजाचे आहेत. महाराष्ट्रातील भटक्या आणि विमुक्त समाजातील लोकांचे पुनर्वसन आणि शिक्षणासाठी जे अविरत मेहनत घेत आहेत असे हे गिरीश प्रभुणे. या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी गिरीश प्रभुणेंना भारत सरकारने सामाजिक कार्य या क्षेत्रातून पद्मश्री या राष्ट्रीय सन्मानाने सन्मानित केले. ते चिंचवड येथे पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या संस्थेचे संस्थापक व क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत.       

भटके आणि विमुक्त समाजाची लोक हे कित्येक वर्षांपासून समाजाच्या मुख्य प्रवाहापासून लांब आहेत. उपजीविकेसाठी ते नेहमी स्थलांतर करतात, एका जागी वास्तव्य नसते. स्वातंत्र्यानंतर बरेच समाज मुख्य प्रवाहात आले, त्यांची प्रगतीही झाली परंतु वंचित पारधी समाज हा गरिबी आणि अशिक्षिततेमुळे अजूनही मागासलेलाच आहे. अशा लोकांना सुशिक्षित करण्यासाठी आणि त्यांनाही समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गिरीश प्रभुणे हे भटके विमुक्त समाज परिषदेच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष काम करताहेत. ते चार पुस्तकांचे लेखकही आहेत व ‘पालावरचे जिणं’ या पुस्तकाच्या २५ आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत.

या समाजातील मुलामुलींना घरच्या गरीब परिस्थितीमुळे शिक्षण घेणे अशक्य होते. अशांसाठी गिरीश प्रभुणे यांची चिंचवड मधील पुनरुत्थान गुरुकुलम ही संस्था काम करते. आजवर वेगवेगळ्या समाजातील तसेच पिंपरी-चिंचवड मधील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घरातील ३२० च्या वर विद्यार्थ्यांनी तिथे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या कौशल्याचा विकास होऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचे काम ही संस्था अनेक वर्ष करत आहे. पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण ही संस्था पुरवते. विद्यार्थ्यांच्या अंगीकृत कौशल्यावरून त्याला पुढील शिक्षण दिले जाते. या शाळेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमासोबतच भारताची संस्कृती आणि परंपराही शिकवल्या जातात. विद्यार्थ्यांना पहिली पासूनच गणित, वैदिक गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल आणि चालू घडामोडींची माहिती करून दिली जाते. यासोबतच विद्यार्थ्यांचा कल पाहून त्यांना शेती, कुक्कुटपालन, कला, संगणकीय, गृहविज्ञान, दुग्ध व्यवसाय, समाजशास्त्र, सुतारकाम इत्यादीही शिकवले जातात. या समाजांच्या पारंपरिक कौशल्यांचा नवीन युगातील कौशल्यांशी मेळ घालण्यावर संस्था जास्त भर देते जसे की वडार समाजाचे पारंपरिक कौशल्य हे शिल्पकला पण त्याची सांगड नवीन शिक्षणाची घालून त्यांना ते स्थापत्यशास्त्राचे शिक्षण देतील.

या समाजातील मुलांसाठी प्रभुणे यांनी विविध ठिकाणी वसतिगृहेही उभारली. पारधी समाजातील महिलांसाठी त्यांनी बचत गटाची सुरुवात केली. समाजातील महिलांच्या नावावर सातबारा करून त्यांना जमिनीचा हक्क मिळवून देण्याचे कामही त्यांनी केले आहे. त्यांनी पिंपरी-चिंचवड मध्ये राज्यस्तरीय दलित साहित्य संमेलन भरवले ज्यामध्ये ७०० दलित साहित्यिक सहभागी झाले होते. या समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी अनेक मेळावे घेतले व समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. प्रभुणे यांनी गेल्या ३५ वर्षांपासून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. त्यांच्या या कष्टाला आमचा सलाम.

पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या संस्थेला तुम्ही अनेक प्रकारे मदत करू शकता. तुम्ही स्वतः तिथे दररोज २ तास किंवा काही निश्चित तास जाऊन त्यांच्या कार्याला हातभार लावू शकता. तुम्ही संस्थेचे स्वयंसेवक\ स्वयंसेविकाही होऊ शकता. देणगी स्वरूपात मदत करण्यासाठी खालील तपशिलाचा वापर करा –

Bank Name – Bank Of Maharashtra

Branch – Chinchwad, Pune, Maharashtra.

Account No. -20160417056

IFSC-MAHB0000127

पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या संस्थेच्या अधिकृत वेबसाईटद्वारे तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. http://gurukulamonline.org/how-you-can-help/