हजारो अनाथ मुलांच्या आई सिंधुताई सपकाळ यांना भारताच्या ‘पद्मश्री’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिंधुताई मूळच्या महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथील. घरी अतिशय गरीब परिस्थिती. वडील अभिमान साठे गुरे राखण्याचे काम करीत. ज्या गावात त्या वाढल्या तिथेही सुविधांचा अभाव. घरी मुलगी नको असल्याने जन्मताच त्यांचे नाव चिंधी (कापडाचा फाटलेला तुकडा) असे ठेवण्यात आले. एक मुलगी म्हणून त्यांना घरातूनच फार भेदभाव सहन करावा लागला खासकरून त्यांच्या आईकडूनच. माई मुळात फार हुशार परंतु घरची परिस्थिती नसल्याने जेमतेम चौथी पर्यंतचे शिक्षण घेऊ शकल्या. ते ही वडील घरची गुरे राखण्यासाठी बाहेर पाठवायचे तेव्हा त्या शाळेत जाऊन बसायच्या.

माई जेव्हा १२ वर्षाच्या झाल्या तेव्हा त्यांचे लग्न त्यांच्या पेक्षा दुप्पट वयाने मोठ्या श्रीहरी सपकाळ यांच्यासोबत करण्यात आले. सासरी अतिशय गरीब परिस्थिती. शिक्षणासाठी परवानगी नव्हती. पण अशातही माई पेपराचे जे काही तुकडे मिळतील ते उंदराच्या बिळात लपवून ठेवीत व घरी कोणी नसेल त्यावेळी ते चोरून वाचीत. घरी अतोनात छळ होत होता. नवरा मारहाण करीत असायचा. परंतु घरी कितीही त्रासदायक वातावरण असले तरी माई कधीच निराश झाल्या नाहीत. अन्यायाविरुद्ध त्यांचा लढा चालूच होता. माईंची तीन बाळंतपणे झाली पण खरा संघर्ष चौथ्या बाळंतपणापासून सुरु झाला. त्यावेळी गुरे वळणे हा व्यवसाय होता शिवाय गुरेही शेकडोंनी असायची. त्यांचं शेण काढण्यासाठी महिला मजूर होत्या. एवढं शेण काढूनही बायकांना मजुरी मिळत नसायची. या व्यवस्थेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. माई तो लढा तर जिंकल्या पण समाजाचा रोष मात्र ओढवून घेतला.

अशा गर्भवती अवस्थेत असतानाच गावातील एका व्यक्तीने त्यांच्याविषयी त्यांच्या नवऱ्याच्या मनात संशय निर्माण केला. हे मूल आपले नाहीच या संशयाने माईंच्या पतीने त्यांना बेदम मारहाण केली व घरातून हाकलून दिले. नवऱ्याने सोडले म्हणून गावकऱ्यांनीही त्यांना गावातून हाकलून दिले. एका गायीच्या गोठ्यात त्यांनी मुलीला जन्म दिला. आपल्या नवजात मुलीला घेऊन अर्धमेल्या अवस्थेत त्या माहेरी गेल्या पण तिथेही त्यांच्या सख्ख्या माणसांकडून पाठ फिरवण्यात आली. स्वतःला व मुलीला जिवंत ठेवण्यासाठी माई रेल्वे किंवा रस्त्यावर भीक मागत. मिळालेले जे काही असेल ते तेथील सर्व अनाथ लोकांमध्ये वाटून खात. हळूहळू तिथेही अन्न मिळेनासे झाल्यानंतर त्यांनी मुलीसोबत स्मशानात राहण्याचा निर्णय घेतला.
अशा अवघड परिस्थितीत सिंधुताई अनाथ मुलांसोबत वेळ घालवीत. आईबाप नसलेल्या मुलांवर कशी वेळ येते हे त्यांनी जवळून पहिले. त्याचवेळी त्यांनी अनाथ मुलांना सांभाळण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्ष अतिशय हलाखीच्या परिस्थितीत भीक मागून त्यांनी अनाथ मुलांचा संभाळ केला. बऱ्याच मेहनती नंतर त्यांनी महाराष्ट्रातील चिखलदरा येथे त्यांचा पहिला अनाथाश्रम उभारला.

माईंच्या दोन पालक संस्था आहेत. त्या –
• सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन आणि शिक्षण संस्था पुणे
• वनवासी गोपालकृष्ण शिक्षण क्रीडा प्रसारक मंडळ, अमरावती
समकक्ष संस्था –
• सन्मती बाल निकेतन मांजरी, हडपसर, पुणे
• ममता बाल सदन, सासवड, पुणे
• सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, चिखलदरा
• अभिमान बाल भवन, वर्धा
• गोपिका गोरक्षण केंद्र, वर्धा

मुलामुलींचे शिक्षण, राहणे, भोजन यांची सुविधा या संस्थेतून केली जाते. शिवाय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मार्गदर्शनही दिले जाते. स्वावलंबी झालेल्या मुलामुलींचे लग्नकार्यही या संस्थांकडून केले जाते. या संस्थेतील मुले आज मोठी होऊन डॉक्टर्स, वकील बनली तसेच इतरही प्रतिष्ठित क्षेत्रात कामही करत आहेत.

माईंना त्यांच्या कार्यासाठी आजवर ७५० पेक्षा अधिक सन्मानांनी पुरस्कृत केलेले आहे. त्यांपैकी थोडक्यात काही म्हणजे अहिल्याबाई होळकर पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे चा गौरव पुरस्कार, सह्याद्री हिरकणी अवॉर्ड इत्यादी. माईंवर ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा मराठी भाषेतील चित्रपट प्रदर्शित झाला आहे ज्यामध्ये तेजस्विनी पंडित यांनी माईंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निवड लंडनच्या ५४व्या फिल्म फेस्टिवलमध्ये जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्यासाठी झाली होती.

या मुलांची सर्व जबाबदारी माईच घेतात. माईंच्या कोणत्याही संस्थेतून मुलांना दत्तक दिले जात नाही. मात्र त्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी तुम्ही संस्थेना देणग्या नक्कीच देऊ शकता. तुम्ही पेपाल किंवा कोणत्याही क्रेडिट कार्डने ऑनलाईन देणगीही देऊ शकता. त्यासाठीचे तपशील खालीलप्रमाणे:
Bank: IDBI Bank
IFSC: IBKL0000102
Name: Sanmati Bal Niketan
Type: Savings
A/c No: 102104000077288

स्वतःची ४ अपत्ये सांभाळीत माईंनी आजवर १००० च्या वर अनाथ मुलांना सांभाळले आहे. अशा या अनाथांच्या आईला भारत सरकारने या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी पद्मश्री या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या कार्याला व मातृत्वाला सलाम.

माईंच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही त्यांच्या कार्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता. https://www.sindhutaisapakal.org/index.html